Uncategorized
डॉ. प्रा.तानाजी सावंत, राहुल मोटे, प्रवीण रणबागुल लागले कामाला
मतदारांचा कौल घेण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांना करावी लागणार कसरत
२४३ परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून शिवसेना (शिंदे गट) कडून डॉ. प्रा. तानाजी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडून राहुल मोटे तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सध्या परंडा विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवार आपली उमेदवारी निश्चित समजून गाव, वाडी, वस्तीवर जाऊन मतदारांच्या भेटीवर भर देत आहेत.
परंडा विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होते की बहुरंगी लढत होते? याची चर्चा जोर धरू लागली आहे. आणखी इच्छुक असलेले उमेदवार काय निर्णय घेतात याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी (शरद पवार) चे उमेदवार माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी मिळाली तर आघाडीचा धर्म पाळण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (उ.बा.ठा.) मधील नेते कार्यकर्ते किती जोमाने आपला आघाडीचा धर्म पाळतात हे पाहावे लागेल.
तर शिवसेना (शिंदे गट) कडून विद्यमान आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून मागील दोन महिन्यापासून तानाजी सावंत यांच्या गाव भेटीगाठी सुरू आहेत. यामध्ये महायुतीमधील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) मधील नेते व कार्यकर्ते देखील महायुतीचा धर्म पाळून डॉ. प्रा. तानाजी सावंत यांच्या उमेदवारीवारीला बळ देण्यासाठी किती पराकाष्टा करतात हे देखील पाहावे लागेल
मनोज जरांगे पाटील फॅक्टर
मराठा योद्धा जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होऊ शकली नाही म्हणून लोकसभेबरोबरच आता विधानसभेच्या निवडणुकीत मराठा मतदार कोणाच्या पारड्यात आपल्या मताचे झुकते माप देतो याची देखील चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू आहे.याचा कोणाला किती फायदा व कोणाला किती तोटा होणार हे निकालानंतरच समजेल.