राजकिय
परंड्यात आ. तानाजी सावंत विरुद्ध रणजित ज्ञानेश्वर पाटील
माजी आमदार राहुल मोटे काय भूमिका घेणार?
धाराशिव : महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडून जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली तर शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांचे तिकीट निश्चित मानले जात होते. परंतु आज उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे रणजीत सिंह पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने राहुल मोटे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार तानाजी सावंत यांना महायुतीतील शिवसेनेकडून दुसर्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.परंडा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी या तीन पक्षाच्या महायुतीने उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. त्यानंतर लगेच महाविकास आघाडीतील ठाकरे सेनेकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजीत पाटील यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे.
परंड्यात पाटील विरूध्द सावंत अशी लढत होणार आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाल्यामुळे मतदारसंघात सहानुभूतीची लाट आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी दावा केला होता. परंतु पक्षश्रेष्ठींनी ही जागा राष्ट्रवादीऐवजी शिवसेना ठाकरेसेनेला बहाल करून ज्ञानेश्वर पाटलांचे चिरंजीव रणजीत पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी दिली आहे. विद्यमान आमदार सावंत यांच्याविरोधात नवा चेहरा दिल्याने सहानुभूतीचा फायदा पाटील यांना होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.