राजकिय
आमदारकीच्या तिकिटावरून अजित पवार गटात अंतर्गत बंडाळी
निवडणुकीसाठी मी इच्छूक असून मला आ काळे यांनी मदत करावी - सुरेश पाटील
आमदारकीच्या तिकिटावरून अजित पवार गटात अंतर्गत बंडाळी
निवडणुकीसाठी मी इच्छूक असून मला आ काळे यांनी मदत करावी – सुरेश पाटील
धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) – आमदारकीच्या तिकिटावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत बंडाळी सुरू झाली असून धाराशिव कळंब मतदारसंघात पक्षाचे जेष्ठ नेते सुरेश पाटील आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झाली असून काळे यांना मी नेहमी सहकार्य केले आहे आता त्यांनी माझ्या उमेदवारीसाठी मला सहकार्य केले पाहिजे असे आवाहन सुरेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलं आहे.
पुढे बोलताना महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर धाराशिव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छूक आहे. मागच्या निवडणुकीसाठी आ. विक्रम काळे यांच्या प्रचाराचे काम केले आहे. तसेच लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवार असलेल्या अर्चनाताई पाटील यांच्या देखील प्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ७० सभा घेतलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये धाराशिव विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छूक आहे. यासंदर्भात पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या मतदारसंघाच्या उमेदवारीचा दावा देखील केला असून विजय निश्चित आहे. त्यामुळे आमदार विक्रम काळे यांनी मला पाठिंबा देऊन सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी दि.१८ ऑक्टोबर रोजी केले.
धाराशिव शहरातील सुरेश पाटील यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, आमदार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे कार्यालय स्थापन करण्यापासून प्रचार करण्यासाठी वेळ दिला. तसेच त्यांच्याच प्रचारासाठी जयंत पाटील आले होते. त्यावेळी आमदार काळे यांनी मला त्यांना हेलिपॅडवरून आणण्याची व कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर मी उपमुख्यमंत्री तथापक्ष प्रमुख अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढविण्यासाठी जिल्ह्यात मेळावा व बैठका घेतल्या असून मी अजित पवार यांचा माणूस असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तर धाराशिव विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढणार असल्याचे आमदार विक्रम काळे यांनी सांगितल्यानंतर माझ्यासह जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे व प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार तिघेजण आमदार काळे यांच्या घरी जाऊन त्यांना तुम्ही निवडणूक लढू नये असे सांगितले. तसेच तुम्ही तीन वेळा शिक्षक आमदार असताना इतरांना संधी देणे अपेक्षित असून तुम्ही निवडून येऊ शकत नाहीत. तुमच्याकडे निवडून येण्यासाठी आवश्यक असलेले राजकीय गुण नसल्याचे देखील त्यांना पटवून दिले. तरीदेखील त्यांनी मला निवडणूक लढून विजयी व्हा असे सांगितल्यामुळे या निवडणुकीसाठी मी इच्छूक असे म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांचे भाऊ अनिल काळे व इतर एकजण माझ्या घरी आले. त्यांनी तुम्ही आमदार काळे यांची शिफारस करा अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पालकमंत्री तानाजीराव सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व केशव सावंत यांना भेटून सांगितले की, जर महायुतीमध्ये तुम्हाला तिकीट मिळाले तर मी तुमचा प्रचार करीन. मला तिकीट मिळाले तर तुम्ही प्रचार करा असे सांगितल्यानंतर त्यांनी देखील होकार देत सहमती दर्शविल्याचे त्यांनी नमूद केले. आमचा पक्ष लहान असून माझे जिल्ह्यातील महायुती घटक पक्षांतील
आमदार राणाजगजितसिंह पाटील, पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्याशी चांगले संबंध असल्याचे आहेत. मी तळागाळातील सर्व समाज घटकांच्या नागरिकांची संपर्क साधून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे माझा थेट जनतेची संपर्क आहे. तर आ काळे यांचा असा जनसंपर्क नसल्यामुळे त्यांनी विधानसभेची निवडणूक न लढविता मला पाठिंबा देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.